- पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी; सांगवी पोलिसांत गुन्हा, एक आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २० ऑगस्ट २०२६) :- इन्स्टाग्रामवरील चॅटिंग आणि फोटोचे पुरावे असल्याचे सांगून पोलिसांत तक्रार न करण्याच्या बदल्यात ३० लाख रुपयांची मागणी करून १३ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार पिंपळे सौदागर येथे समोर आला आहे. तसेच पुन्हा पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी विराज गोपाळ कुटे (वय २१, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शुभम लक्ष्मण निवेकर (वय १९, रा. शिवराज नगर कॉलनी क्रमांक २, काळेवाडी) आणि हर्षवर्धन बलभीम आयवळे (वय २१, रा. शिवराज नगर कॉलनी क्रमांक २, काळेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी हर्षवर्धन आयवळे याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आरोपी शुभम निवेकर याने फिर्यादीच्या लहान भावाला, संग्राम कुटे याला, त्याच्या बहिणीसोबत केलेल्या इन्स्टाग्राम चॅटिंग व फोटोचे पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगितले. हे प्रकरण पोलिसांत जाऊ नये यासाठी ३० लाख रुपये देण्याची मागणी करत पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीद्वारे संग्रामकडून १३ लाख रुपये उकळल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी दुपारी पिंपळे सौदागर गावात फिर्यादीच्या भावासमोर आरोपीने पुन्हा येऊन जुन्या प्रकरणाचा उल्लेख केला. प्रकरण कायमचे मिटवायचे असल्यास आणखी पैसे द्यावे लागतील, अन्यथा दोन दिवसांत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०८(३), ३०८(५), ३५१(२), ३(५) तसेच भादंवि कलम ३८५, ३८६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खंडणी पथकाकडून सुरू आहे.


















