- शिरूर तालुक्यातील दोन रस्त्यांच्या कामांची निविदा मिळवण्यासाठी कागदपत्रांत फेरफार केल्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२६) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) निविदा प्रक्रियेत बनावट कार्यपूर्ण प्रमाणपत्रांचा वापर करून निविदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकाविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पीएमआरडीएच्या निविदा प्रक्रियेत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या सत्यतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी ज्ञानोबा मुरलीधर चौरे (वय ५७, व्यवसाय उपअभियंता, अभियांत्रिकी विभाग, पीएमआरडीए, आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेसर्स एसपीडी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीचे संचालक शहाजी पांडुरंग देवकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमआरडीएच्या प्राधिकरण सभा क्रमांक ११ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या शिरूर तालुक्यातील दोन रस्त्यांच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये तळेगाव ढमढेरे-मझाक इंडिया-पिंपळे जगताप ते करंदी फाटा जोडणारा रस्ता तसेच सणसवाडी ते पिंपळे जगताप या रस्त्यांचा समावेश होता.
ही निविदा मिळविण्यासाठी आरोपीने कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सही व शिक्क्याचे असल्याचे भासणारे तीन ई-कार्यपूर्ण प्रमाणपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. मूळ प्राकलन रकमेमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून ही प्रमाणपत्रे बनावट तयार करण्यात आली. सदर प्रमाणपत्रे बनावट असल्याची माहिती असतानाही ती खरी असल्याचे भासवून ऑनलाइन निविदा प्रक्रियेत सादर करून वापरल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२), ३३६(३), ३३७, ३४०(२) तसेच भादंवि कलम ४६५, ४६८, ४६६, ४७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निगडी पोलिसांकडून सुरू आहे.


















