- बॉश, टीव्हीएस मोटर आणि नॅशनल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजच्या स्वामित्व हक्काचे उल्लंघन केल्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २० ऑगस्ट २०२६) :- नामांकित कंपन्यांच्या ब्रँडचा गैरवापर करून बनावट ऑटोमोबाईल पार्ट्स तयार करून त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे ३ लाख २८ हजार ७२० रुपये किमतीचे बनावट ऑटोमोबाईल पार्ट्स आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी रेवननाथ विष्णू केकाण (वय ४४, रा. सर्वे क्रमांक ३७/१४, काळेपडळ, हडपसर, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नीरज सुभाषचंद्र भाटिया (वय ५१, रा. २२ ई १०, प्रतापनगर, सेक्टर २२, जयपूर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारास हिंजवडी परिसरातील वेताळनगर येथील रामालय निवास, रूम क्रमांक जी-०२, ग्राउंड फ्लोअर येथे आरोपी आढळून आला. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संबंधित कंपन्यांच्या स्वामित्व हक्काचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
बॉश लिमिटेड, टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांच्या नावाने अथवा त्यांच्या स्वामित्व हक्काशी संबंधित बनावट ऑटोमोबाईल पार्ट्स तयार करून ते विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात बाळगल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या पार्ट्सची एकूण किंमत ३ लाख २८ हजार ७२० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी कॉपीराईट अॅक्ट १९५७ चे कलम ५१ व ६३ अन्वये हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा १९ ऑगस्ट रोजी रात्री ८.२० वाजता दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.


















