- नाट्य, संगीत, साहित्य, लोककला, मर्दानी खेळांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; गुणवंतांचा ‘रत्न’ पुरस्कारांनी गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ ऑगस्ट २०२६) :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील कला, साहित्य व सांस्कृतिक चळवळीला व्यापक व्यासपीठ देण्यासाठी ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात १८ ते २० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसीय महोत्सव होणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.
महोत्सवात व्यावसायिक मराठी नाटकांचे प्रयोग, भावगीत, नाट्यगीत व भक्तिगीतांची संगीत मैफल, लावणी, रॉक बँड, राज्यस्तरीय कवी संमेलन तसेच लाठी-काठी, दांडपट्टा यांसारख्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. महिलांसाठी पाककला स्पर्धा व फॅशन शो, तर बालकलाकारांसाठी बालनाट्य व बाल एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
पारंपरिक वस्तू, हस्तकला, स्थानिक कलाकुसर आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘संस्कृती जत्रा’ व प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.
शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या गुणवंतांचा ‘कलारत्न’, ‘साहित्यरत्न’, ‘क्रीडारत्न’, ‘नृत्यरत्न’ आणि ‘संगीतरत्न’ पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे.
महोत्सवात नागरिक, कलाकार, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सव समितीने केले आहे.


















