- मारहाण करून खंडणीची मागणी; तीन चेक व प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ ऑगस्ट २०२६) :- पाच कोटी रुपयांची खंडणी मागून बांधकाम व्यावसायिकाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी चौघांसह तीन ते चार अनोळखी व्यक्ती आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महेंद्र रामकरणदास अगरवाल (वय ६२, बांधकाम व्यवसाय, रा. मार्केटयार्ड, पुणे) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर मुलचंदाणी, नरेंद्र यादव, महादेव साबळे, सुनिल डोंगरे तसेच तीन ते चार अनोळखी इसम आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेबारा ते दुपारी दोनच्या दरम्यान पिंपरी येथील जयहिंद शाळेसमोरील एका कार्यालयात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपी अमर मुलचंदाणी याने आपण फिर्यादीला मदत केली असल्याचे सांगून, आपल्या राहत्या घरावर ईडीची जप्ती कारवाई होणार असल्याने पैसे देण्याची मागणी केली. मात्र फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपी व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून त्यांना इच्छेविरुद्ध मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
यावेळी आरोपींनी तीन चेक आणि एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. तसेच अॅट्रॉसिटीचा तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम ३०८(५), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

















