न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. ६ ऑक्टोबर २०२६) :- पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना थेरगावातील मधुबन कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीनाथ संभाजी वावळे हे मधुबन कॉलनीतील पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे राहत होते. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास आरोपी यल्लालिंग ऊर्फ यल्लाप्पा शिवशरणप्पा आळंदकर हा वावळे यांच्या घरी आला. आरोपीचे वावळे व त्यांच्या कुटुंबीयांशी कौटुंबिक संबंध व ओळख होती.
यावेळी पैशांच्या देण्याघेण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातून आरोपीने काशीनाथ वावळे यांच्यावर चाकूने चार ते पाच वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वावळे यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी यल्लालिंग ऊर्फ यल्लाप्पा आळंदकर याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धुमाळे करत आहे.

















