- लोणावळ्यात उडाली खळबळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
लोणावळा (दि. ६ ऑक्टोबर २०२६) :- लोणावळ्यातील भुशी गावातील हॉटेल ‘मोतीराम’च्या आवारात ५ ऑक्टोबर रोजी माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे ३३ वर्षीय सुपुत्र अभय मराठे यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. रायफल साफ करताना अचानक गोळी सुटल्याने हा प्रकार घडल्याचा बनाव सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदनादरम्यान पोलिसांना संशय आल्याने तपासाची दिशा बदलली.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संशयितांची चौकशी याआधारे पोलिसांनी तपास पुढे नेला.
तपासादरम्यान अभय मराठे यांचा मृत्यू अपघाती नसून प्रॉपर्टीच्या वादातून त्यांच्याच ८३ वर्षीय आजोबांनी खून केल्याचे निष्पन्न झाले. खुनानंतर रायफल साफ करताना अचानक गोळी सुटल्याचा बनाव रचण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले.
या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी गुन्ह्याचे गूढ उकलले असून, ८३ वर्षीय आजोबांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

















