- उत्तर महाळुंगे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; यवतमाळमधून आठ आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ६ ऑक्टोबर २०२६) :- उसतोडीच्या उचलीच्या पैशांच्या व्यवहारातून एका व्यक्तीचे अपहरण करणाऱ्या टोळीला उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातून ताब्यात घेतले. अपहरण झालेल्या राजेश बाळू चव्हाण यांची पोलिसांनी २४ तासांच्या आत सुखरूप सुटका केली. या कारवाईत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली हुंदाई व्हेन्यू कार, तीन ऑटो रिक्षा आणि अपहृत व्यक्तीची शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
घाटेवस्ती, आंबेठाण परिसरातून तीन रिक्षांमधून आलेल्या आरोपींनी राजेश चव्हाण यांचे त्यांच्या मोटारसायकलीसह अपहरण केले होते. याप्रकरणी राजेश यांच्या पत्नी सुषमा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान अमोल रामराव राठोड, सचिन रामराव राठोड आणि निलेश संतोष राठोड यांना शिक्रापूर येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत हा गुन्हा संदीप गुलाब राठोड याच्या उसतोडीच्या टोळीच्या उचलीच्या पैशांच्या व्यवहारातून आठ जणांनी मिळून केल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी तातडीने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दिंडाळा येथे कारवाई केली. उर्वरित आरोपींना ताब्यात घेत राजेश चव्हाण यांची गुन्हा घडल्यापासून २४ तासांच्या आत सुखरूप सुटका केली.
अमोल रामराव राठोड (२९), सचिन रामराव राठोड (२५), निलेश संतोष राठोड (२७), शुभम प्रल्हाद जाधव (२५), संदीप गुलाब राठोड (४२), इंदल थावरा जाधव (४०), राजू बापुराव चव्हाण (४४) आणि संदीप उदयभान जाधव (३२), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली. या कारवाईनंतर पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे करीत आहेत.


















