न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०१९) :- महापालिका सभेत सह शहर अभियंता राजन पाटील यांना शहर अभियंतापदी बढती देण्याच्या उपसूचनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. यावरून वादंग झाले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर पैसे खात असल्याचा आरोपही केला. यावर सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज शुक्रवार रोजी जोरदार पलटवर केला आहे.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, महापालिकेचे शहर अभियंतापद रिक्त आहे. कर्मचारी महासंघाने स्थानिक अधिका-याकडेच शहर अभियंतापद देण्याची मागणी केली होती. सह शहर अभियंता राजन पाटील या पदासाठी पात्र ठरत आहेत. सध्या त्यांच्याकडेच शहर अभियंतापदाचा प्रभारी पदभार आहे. पात्र ठरत असल्याने पाटील यांना शहर अभियंतापदी बढती देण्याची उपसूचना मंजूर केली.
उपसूचना सुसंगत आहे की विसंगत हे प्रशासन ठरवेल. महासभेने मंजुरी दिली. तरी, नगरविकास मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होईल, याचे भान देखील विरोधकांना राहिले नाही. आम्ही अधिका-यांच्या बढत्यांमध्ये लक्ष घालत नाही. केवळ चांगले काम करणा-या अधिका-यांशी सत्ताधारी म्हणून आम्ही पाठिशी राहतो. ज्यांचे आयुष्य अर्थकारणामध्ये गेले. त्यांनी आम्हाला नितिमत्ता सांगण्याची आवश्यकता नाही, अशी टिप्पणीही पवार यांनी नाव न घेता राष्ट्रवादींच्या पदाधिकाऱ्यांवर केली आहे.















