मतदारांत संभ्रमात त्यामुळे उमेदवार गॅसवर
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २१ जून २०१९) :- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४२ मधील निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उल्हास शेवाळे यांना माघार घ्यायला लावल्याने शिवसेनेत नाराजी आहे. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी, शिवसैनिकांनी प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. अनेक शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याने मतदारांत संभ्रम आहे.
प्रभाग क्रमांक ‘४२ अ’ मधून निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केलेले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उल्हास शेवाळे यांना शिवसेनेच्या मंत्र्यांच्या हट्टापोटी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष अर्ज भरणारे उमेदवार अमोल हरपळेंना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली. हरपळेंना शिवसेनेने अधिकृतपणे पुरस्कृत केल्याचे पत्र दिले नसल्याचे समजते. त्यामुळे शिवसैनिकांसह मतदारांत संभ्रमाचे वातावरण आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश ढोरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. हरपळेंच्या प्रचारात आतापर्यंत सेनेचे वरिष्ठ नेते अथवा शिवसैनिकांनी सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून इच्छूक असलेले माजी पंचायत समिती सदस्य शंकरनाना हरपळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उघडपणे प्रचार करीत आहेत.
शिवसेनेच्या या भूमिकेमुळे या प्रभागातील युतीमधील भाजपच्या उमेदवार अश्विनी पोकळे अडचणीत आल्याने भाजपच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे. या प्रभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा फटका आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.















