- तरुणाचे नाक फ्रॅक्चर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- अमूल दूध कंपनीच्या नावाने विक्री होत असलेल्या दुधाचा व्हिडिओ काढल्याच्या रागातून एका ४३ वर्षीय व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना पिंपरीतील साई चौकाजवळ घडली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात चौघांसह अन्य चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास साई चौकाजवळील चिराग फर्निचर दुकानासमोर घडली. याबाबत मोहन प्रकाश सबनानी (वय ४३, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, सबनानी हे घरी जात असताना त्यांना परिसरात गर्दी दिसली. काही नागरिक टेम्पोजवळून दुधाची पाकिटे घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चौकशी केली असता अमूल ब्रँडच्या नावाने ६० रुपये किमतीचे दूध ३० रुपयांना विकले जात असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी कंपनीला पाठविण्यासाठी मोबाईलमध्ये या प्रकाराचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली.
यावेळी आरोपी जितु मायारामानी याने सबनानी यांना व्हिडिओ डिलीट करण्यास सांगत त्यांच्या नाकावर ठोसा मारला. त्यानंतर हितेश मायारामानी याच्यासह रोहण, परवेझ आणि अन्य चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी वाद घालत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सबनानी यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड आणि पोलीस उपनिरीक्षक राजपूत करीत आहेत.


















