न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २६ सप्टेंबर २०२६) :- बनावट सोने खरे असल्याचे भासवून तीन सोन्याच्या चैन गहाण ठेवत ज्वेलर्सची ४ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चाकण येथे समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले चौक, चाकण येथील सिद्धनाथ ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला. आरोपी अभिजित पंडु गदळे (वय २२, रा. केसनंद, हवेली) आणि समीर सुरेश माने (वय ३३, नवी मुंबई) यांनी बनावट सोने खरे असल्याचे भासवून एकूण ५२.२७० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या चैन ज्वेलर्सकडे गहाण ठेवल्या.
या बदल्यात त्यांनी ज्वेलर्सकडून ४ लाख ४४ हजार रुपये रोख घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपींनी पुन्हा बनावट सोन्याचे ब्रेसलेट खरे असल्याचे भासवून ते ज्वेलर्सला विकण्याचा आणि त्याबदल्यात पैसे घेण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी ज्वेलर्स व्यावसायिक विकासनाथ भारते (वय ४५) यांनी उत्तर चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

















