- एक बस जळून खाक, दोन बसांचे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ०१ ऑक्टोबर २०२६) :- पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी परिसरात खासगी ट्रॅव्हल्सच्या बसच्या गॅरेजमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असतानाच एका बसने अचानक पेट घेतला. आगीने काही क्षणांतच उग्र रूप धारण केल्याने एक बस पूर्णपणे जळून खाक झाली, तर शेजारी उभ्या असलेल्या अन्य दोन बसांचेही मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) सायंकाळी सुमारास गवळी पार्किंगजवळ घडली.
गवळी पार्किंग परिसरातील गॅरेजमध्ये तीन खासगी ट्रॅव्हल्स बस दुरुस्तीसाठी उभ्या होत्या. त्यापैकी एका बसमध्ये अचानक आग भडकली. बसमधील कुशन, सीट आणि पडदे यामुळे आगीचा वेग वाढला. काही वेळातच आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली. वल्लभनगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रासह भोसरी, चोवीसावाडी, मोशी आणि चिखली येथून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला. तब्बल पाच अग्निशमन बंबांच्या मदतीने जवानांनी सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, आगीमुळे परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. भोसरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दी हटवत परिसर सुरक्षित केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, त्याबाबत तपास केला जात आहे.


















