- १३४ किलो खाद्यपदार्थ जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ०१ ऑक्टोबर २०२६) :- सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत चिंचवड येथील प्रदीप स्वीट्समध्ये तपासणी करण्यात आली. यावेळी १८ किलो फरसाण आणि ११६ किलो सॉल्टेड बटाटा वेफर्स असा एकूण १३४ किलो खाद्यसाठा ताब्यात घेण्यात आला.
एफडीएच्या पथकाला तपासणीदरम्यान काही खाद्यपदार्थ निर्धारित गुणवत्तेच्या निकषांशी विसंगत असल्याचे आढळून आले. तसेच काही पदार्थांवर लेबलिंगसंदर्भातील त्रुटी असल्याचे आणि काही खाद्यपदार्थ असुरक्षित असल्याचे तपासणीत समोर आले. त्यामुळे विक्रीसाठी ठेवलेला संबंधित साठा जप्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधित आस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाईची पुढील प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे सणासुदीच्या काळात मिठाई, फरसाण आणि इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या तपासणीकडे लक्ष वेधले गेले आहे.
याबाबत सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन संजय चट्टे यांनी सांगितले की, प्रदीप स्वीट्समध्ये तपासणी केल्यानंतर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणारे खाद्यपदार्थ आढळले. संबंधित दुकानाला नोटीस देण्यात आली असून, नमुने प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे

















