- प्रत्येक फेजसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी द्या..
- पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत विकसकानेच व्यवस्था करावी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ ऑक्टोबर २०२६) :- स्वदेशा हाउसिंग सोसायटीमधील पाणी प्रश्नावर पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने विकसकाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. प्रत्येक फेजसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी उपलब्ध करून द्यावी तसेच महापालिकेकडून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत विकसकाने पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात सोसायटीचे पदाधिकारी, महिला आणि रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आतापर्यंत पाण्यासाठी झालेला खर्च विकसकाने परत करावा, अशीही मागणी करण्यात आली.
मोर्चानंतर विकसकासोबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. मुख्य पाणीपुरवठा होईपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा फेडरेशनने केला.
पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा फेडरेशनने दिला आहे. महापालिका प्रशासनाकडून या प्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.


















