- ६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल..
- ६६.४७ टक्के नागरिकांनी भरला कर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विक्रमी ६१० कोटी ४४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. शहरातील ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी ५ लाख ९ हजार २०० म्हणजेच ६६.४७ टक्के नागरिकांनी कराचा भरणा केला आहे.
गतवर्षी सप्टेंबरअखेर ६०३ कोटी ८२ लाख रुपयांचा कर जमा झाला होता. यंदा त्यात ६ कोटी ६२ लाख रुपयांची वाढ झाली आहे. ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, ४ लाख ४५ हजार मालमत्ता धारकांनी ऑनलाइन माध्यमातून ४७१ कोटी ८३ लाख रुपये जमा केले.
वाकड करसंकलन कार्यालयाने सर्वाधिक ८४ कोटी ९१ लाख, तर थेरगावने ५३ कोटी १५ लाख रुपयांची वसुली केली. महापालिकेने पुढील सहामाहीत उर्वरित थकबाकीदारांकडून कर वसुलीवर विशेष भर देण्याचे नियोजन केले आहे.


















