न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन (दि.२ ऑक्टोंबर २०२६) :- बावधन परिसरातील महिला पीजीमध्ये घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या प्लंबरला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
महिला फिर्यादी (वय ३२, रा. सुसगाव) यांनी याबाबत बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार २६ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ ते २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले महिला फिर्यादी तसेच त्यांची मैत्रीण यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने पीजी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान संशयित हा काळेवाडी फाटा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी राकेश यशवंत दाते (वय ३३) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून चोरी केलेले ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
या प्रकणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.


















