- पाठलाग करून चोरट्याला पकडले; एलिव्हेट कार जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन (दि.२ ऑक्टोंबर २०२६) :- शेअर बाजारात झालेला तोटा भरून काढण्यासाठी मित्राची तब्बल १४ लाख रुपये किमतीची होंडा एलिव्हेट कार चोरी करून राजस्थानमध्ये विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या चोरट्याला बावधन पोलिसांनी पाठलाग करून शिरपूर, जि.धुळे येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची कारही जप्त केली. ही कारवाई गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत करण्यात आली.
प्रथम सोमेश्वरदास गुप्ता, रा. बावधन. यांनी त्यांची नवीन होंडा एलिव्हेट कार चोरीला गेल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कारचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा माग काढला. चोरीची कार पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी प्रथम वाघोली, त्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, चाळीसगावमार्गे धुळ्याकडे घेऊन जात असल्याचे पोलिसांना समजले.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा पाठलाग सुरू केला. अखेर शिरपूर, जि. धुळे येथे पोलिसांनी कार अडवून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव रोहन सत्यनारायण सोमानी (वय २६), रा. वाघोली, मूळ रा. राजस्थान असे सांगितले.
चौकशीत आरोपीने शेअर बाजारात तोटा झाल्याचे सांगितले. हा तोटा भरून काढण्यासाठी त्याने वडील व इतरांकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करण्यासाठी मित्र प्रथम गुप्ता यांची कार चोरी करून ती राजस्थानमध्ये नेऊन विक्री करण्याचा त्याचा बेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बावधन पोलिसांनी आरोपीसह चोरीची १४ लाख रुपये किमतीची होंडा एलिव्हेट कार ताब्यात घेतली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास पोलीस हवालदार फारुक मुल्ला करीत आहेत.


















