- वाहनांचे स्पेअरपार्ट काढून भंगारात विक्री; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन (दि.२ ऑक्टोंबर २०२६) :- मोटारसायकलींची चोरी करून त्यांचे स्पेअरपार्ट वेगळे करत भंगार दुकानदारांना विक्री करणाऱ्या टोळीला बावधन पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून चोरीच्या पाच मोटारसायकली तसेच विविध वाहनांचे स्पेअरपार्ट असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० ते ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान बाणेर येथील रोहन लेअर सोसायटीमधून फिर्यादींची यामाहा एमटी-१५ मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार स्वप्निल साबळे व अक्षय लाटे यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तब्बल ९० ते १०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरट्यांचा माग काढला. तपासात चोरीची मोटारसायकल इंगवले चौक, पिंपळे निलख परिसरात नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी इंगवले चौक परिसरात शोध घेतला असता हॉटेल जगदंबाच्या मागील बाजूस ऋषीकेश साठे याचे फॅब्रिकेशनचे दुकान आढळले. या दुकानात चोरीच्या मोटारसायकलींचे विविध स्पेअरपार्ट वेगळे करून ते भंगार दुकानदारांना विक्री केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी दुकानातून पाच मोटारसायकली व इतर मोटारसायकलींचे स्पेअरपार्ट असा २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पवन मरीआप्पा भज्जी (वय २५, रा. औंध) आणि ऋषीकेश शहाजी साठे (वय २९, रा. पिंपळे निलख) यांना ताब्यात घेण्यात आले असून एका विधीसंघर्षीत बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी साठे याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुढील तपास पोलीस हवालदार फारुक मुल्ला करीत आहेत.


















