- हल्ल्यानंतर आरोपीच्या आई-बहीणीचा पोलिस ठाण्यात राडा; दोघींनाही अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि.२ ऑक्टोंबर २०२६) :- पत्नीशी पुन्हा प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाल्हेकरवाडी येथे घडली. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या आई व बहिणीने चिंचवड पोलिस ठाण्यात गोंधळ घालत पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून दोघींना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील एच.पी. पेट्रोलपंप परिसरात इरफान याच्यावर आरोपी अभिषेक लालमण यादव, नागेश व्यंकटराव चोपडे, अशितोश दयानंद शितोळे, अभिषेक लाल गिरगोसावी व एका विधिसंघर्षित बालकासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला.
इरफान याचे अभिषेक यादवच्या पत्नी हिच्याशी पुन्हा प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. त्यातून आरोपींनी इरफान याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्याच्या पाठीत मणक्याजवळ, हाताच्या अंगठ्यासह पंजा, कोपरा तसेच डोक्याच्या डाव्या बाजूला वार करण्यात आले. त्यानंतर हाताने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी इरफान पळत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. हातातील कोयते फिरवत ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत दहशत निर्माण केली. इरफानला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याचे वडील ईस्माईल गणी शेख आणि भाऊ अहमद यांच्यावरही कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक यादव, नागेश चोपडे, अशितोश शितोळे आणि अभिषेक गिरगोसावी यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी अभिषेक यादवला पोलिसांनी ताब्यात घेऊन चिंचवड पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याची आई व बहीण तेथे आल्या. यादवच्या अटकेस अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने दोघींनी पोलिस ठाण्याच्या आवारात आरडाओरड केली. बहिणीने मोबाईलमध्ये चित्रीकरण करत स्वतःच्या अंगावरील टी-शर्ट काढला, तर आईने पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगला डोके आपटून स्वतःला जखमी केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
तसेच, दोघींनी तपासाच्या कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या गुन्ह्याचा तपास सपोनि शेरखाने, तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास पोउपनि बारवकर करीत आहेत.


















