- अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये अभंग संगीत अकादमीचे उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०२ ऑक्टोंबर २०२६) :- “माणसाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याची नाळ संगीताशी जोडलेली असते. आपल्याला अवगत असलेले ज्ञान आपल्याला नम्र बनवते. निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये संगीत वास करते. आजच्या काळात माणसांनी माणुसकीने वागावे असे वाटत असेल, तर संगीत हा त्यासाठी प्रभावी मार्ग आहे,” असे प्रतिपादन कैवल्य गुरुकुल, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष गुरुवर्य ह.भ.प. गणेश महाराज भगत यांनी केले.
सृजन फाऊंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने ‘अभंग संगीत अकादमी’ची स्थापना करण्यात आली असून, अकादमीचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हार्मोनियम, तबला, गिटार, पखवाज, वीणा, मृदंग, पियानो, काँगो, ऑक्टोपॅड तसेच अभंग गायन, सुगम संगीताचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अभंग संगीत अकादमीचे उद्घाटन कैवल्य गुरुकुल, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष गुरुवर्य ह.भ.प. गणेश महाराज भगत यांच्या शुभहस्ते झाले.
अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी शाळा म्हणून हभप गणेश महाराज भगत यांनी अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचे कौतुक केले. याप्रसंगी श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानचे विश्वस्त हभप शिवाजीमहाराज मोरे, एकादशी भजनी मंडळाचे श्री रामचंद्र अय्यर, श्री कृष्णा चव्हाण, सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री सुनिल कंद, शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी प्रास्ताविक केले. या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, नव्या पिढीमध्ये संगीताची तसेच भारतीय संस्कृतीची गोडी निर्माण करणे हा अभंग संगीत अकादमीचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कला, संस्कार आणि सर्जनशीलतेची जोड मिळावी, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
अभंग संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि वातावरण भारावून टाकले. यावेळी अकादमीतील संगीत शिक्षक श्री रत्नेश्वर गिरी व श्री वसंत हंडीबाग यांचा पालकांना परिचय करून देण्यात आला.
उद्घाटन सोहळ्यास पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ वृषाली आढाव यांनी केले.


















