न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- अमेरिका न्यूयॉर्क येथील रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वतीने दरवर्षी जगभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘‘एस्एई इंटरनॅशनल बाहा’’ ही स्पर्धा भरविण्यात येते. स्पर्धेत या वर्षी भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयास (पीसीसीओई) मिळाली होती.
जून महिन्यात अमेरिकेत झालेल्या ‘एस्एई इंटरनॅशनल बाहा’ या स्पर्धेत जगभरातील नामांकित १०० अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पीसीसीओईच्या ‘टिम रेड बॅरन’ संघाने स्वत: डिझाइन केलेल्या वाहनाचे ‘‘ऑल टेरेन’’ प्रकारातील विविध कसोट्यांवर परीक्षण करण्यात आले. या परीक्षणात पीसीसीआईला ३५ वा क्रमांक मिळाला. ‘‘हील क्लाइंबिंग’’ प्रकारात ७ वा व ‘‘एक्सेलरेशन’’ या प्रकारात जगभरात १६ वा क्रमांक पटकावून पीसीसीओईच्या ११ विद्यार्थ्यांच्या संघाने जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला.
मागील वर्षी ‘‘टीम रेड बॅरन’’ने राष्ट्रीय स्पर्धेत ५ वा क्रमांक मिळविला होता. त्यांना प्रा. उम्मीद शेख यांनी मार्गदर्शन केले. संघाचा कर्णधार अक्षय देशमुख, चालक जयवंत नायडू, आदित्य पाचपुते, अक्षय खामकर, संतोष कार्यनवर, प्रतीक हुले, सुप्रित पाटील, नचिकेत जोशी, प्रतीक तरळे, राजनंदन देसाई, शुभम बडगुजर, सोमेश कवळे व मार्गदर्शक प्रा. उम्मीद शेख यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्हि.एस. काळभोर खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र देवरे यांनी अभिनंदन केले.











