- सभापती अभिषेक बारणेंडून अभिनंदन, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ ऑक्टोबर २०२६) :- पुणे विभागीय बॉक्सिंग स्पर्धा २०२६-२७ मध्ये १९ वर्षांखालील ५७ किलो वजनी गटात थेरगाव येथे सराव करणाऱ्या हर्षित तिवारीने सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे त्याची राज्यस्तरीय एसजीएफआय (SGFI) बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हर्षित तिवारी हा थेरगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सराव करतो. विभागीय स्पर्धेत त्याने प्रभावी कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. त्याच्या या यशाबद्दल अरिंजय मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी हर्षितचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय एसजीएफआय स्पर्धेतही हर्षितने अशीच उत्कृष्ट कामगिरी करत शहराचे नाव उंचवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महापालिकेच्या क्रीडा धोरणाच्या माध्यमातून शहरातील क्रीडा सुविधा, मैदाने, व्यायामशाळांसाठी आवश्यक साहित्य, खेळाडूंसाठी विविध योजना तसेच क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला चालना देण्याचे काम सुरू आहे. शहरातील खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळावी आणि त्यांना आवश्यक प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक क्रीडा प्रकारांमध्ये गुणवंत खेळाडू घडत असून त्यांना स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे स्पर्धात्मक स्तरावर कामगिरी करण्याची संधी उपलब्ध होत आहे. हर्षित तिवारीच्या सुवर्णपदकामुळे थेरगावच्या क्रीडा क्षेत्रातही समाधान व्यक्त होत असून, राज्यस्तरीय स्पर्धेतील त्याच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.


















