- मतदार यादी अंतिम होण्यास विलंबाची शक्यता..
- इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ९ ऑक्टोबर २०२६) :- देहू नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीचे वेध लागले असून, इच्छुक उमेदवारांनी गेल्या महिनाभरापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदारांशी संपर्क वाढविणे, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणे आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यावर इच्छुकांचा भर आहे. मात्र, विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया सुरू असल्याने निवडणुकीच्या वेळापत्रकाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
देहू ग्रामपंचायतीचे रूपांतर होऊन ८ डिसेंबर २०२० रोजी नगरपंचायतीची स्थापना झाली. डिसेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये दोन टप्प्यांत निवडणूक झाली होती. विद्यमान नगरपंचायतीचा कार्यकाळ १० फेब्रुवारी २०२७ रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
एसआयआर प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणे, प्रभागनिहाय मतदारसंख्या निश्चित करणे, प्रभागरचना आणि आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियांना विलंब झाल्यास निवडणुकीचा कार्यक्रमही पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने इच्छुक महिलांमध्येही उत्सुकता वाढली आहे. मात्र, प्रभागरचना आणि आरक्षणातील संभाव्य बदलांमुळे अनेकांचे राजकीय गणित अद्याप अनिश्चित आहे. निवडणूक लांबल्यास इच्छुकांना अधिक काळ मतदारांशी संपर्क ठेवावा लागणार असून, उमेदवार निवड आणि प्रचाराचे नियोजनही बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता एसआयआर प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाकडे देहूकरांचे लक्ष लागले आहे.


















