- विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात होते कार्यरत..
- चतुःशृंगी पोलिसांकडून तपास सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ९ ऑक्टोबर २०२६) :- पुणे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना औंध येथे उघडकीस आली. नीलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५) असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, ते विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे औंध येथील नागरस रोडवरील सुवर्णयुग सोसायटीत कुटुंबासह राहत होते. बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास ते घरी असताना ही घटना घडली. त्यावेळी त्यांचा मुलगाही घरात होता. गोळीबाराचा आवाज ऐकून तो संबंधित खोलीत गेला असता पाटील गंभीर अवस्थेत आढळले.
कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाटील यांना काही काळापासून आरोग्यविषयक त्रास होता. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते अलीकडच्या काळात मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही.
पाटील हे पदोन्नतीने पोलिस उपनिरीक्षक झाले होते. घटनेच्या दिवशी ते उच्च न्यायालयाच्या कामानिमित्त मुंबईला जाणार होते; मात्र ते गेले नाहीत. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.


















