न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि.१२ ऑक्टोबर २०२६) :- हातात लोखंडी कोयता घेऊन तो हवेत फिरवत दुकानदारांसह रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देत दहशत निर्माण केल्याची घटना चिखलीतील स्पाईन रोड परिसरात घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी अनिकेत गणेश देवरे (वय २०, रा.चिखली) याच्यासह एका विधिसंघर्षित बालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.४० वाजण्याच्या सुमारास स्पाईन रोडवरील सेक्टर क्रमांक १८ मध्ये जॉग्रस पार्क गार्डनजवळ सर्व्हिस रोडच्या कडेला हा प्रकार घडला. संबंधितांनी अवैधरित्या लोखंडी कोयता बाळगून तो हवेत फिरवला. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करत, ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादी कोणी लागले तर आम्ही कोणालाही जिवंत सोडणार नाही,’ अशा धमक्या दुकानदारांना आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांना दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दहशतीमुळे दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली, तर रस्त्यावरून जाणारे नागरिक घाबरून सैरावैरा पळू लागले. दहशतीमुळे कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शस्त्रे आणि इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करणारा आदेश लागू आहे. असे असतानाही कोयता बाळगून दहशत निर्माण केल्याने संबंधितांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टच्या संबंधित कलमान्वये चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार अरुण ज्ञानेश्वर साबळे यांनी फिर्याद दिली असून, चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.















![[PCMC] भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा रखडली!](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/images-1-2-190x122.jpeg)


