- भोसरीतील दुर्दैवी घटना; आईची मुलाविरोधात पोलिसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १२ ऑक्टोबर २०२६) :- दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने आई-वडिलांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच वडिलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू उगारला असता, मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या आईच्या डाव्या मनगटावर चाकू लागून त्या जखमी झाल्या. त्यानंतर आरोपीने वडिलांच्या डोळ्याजवळ बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास भोसरीतील चक्रपाणी वसाहत परिसरात घडली.
राहुल प्रल्हाद तळोले (वय ४५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ६३ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा मुलगा आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून त्याने वडिलांना शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, ‘तुम्ही मला दारू पिण्यासाठी पैसे देत नाहीत ना, आज तुम्हाला जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी दिली. त्यानंतर वडिलांच्या छातीवर लाथ मारली.
यानंतर आरोपीने स्वयंपाकघरातील चाकू आणून वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत चाकू उगारला. पतीला वाचवण्यासाठी फिर्यादी महिला मध्ये पडल्या असता, चाकू त्यांच्या डाव्या मनगटावर व मनगटाखाली लागल्याने त्या जखमी झाल्या. आरोपीने महिलेलाही मारहाण करून पोटात लाथ मारली व त्यांना ढकलून दिले. त्यानंतर वडिलांच्या डाव्या डोळ्याजवळ बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी ११ ऑक्टोबर रोजी रात्री भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.


















