न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १२ ऑक्टोबर २०२६) :- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवर चहाच्या टपरीजवळ तरुणाला लोखंडी कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. यावेळी आरोपींनी लाकडी दांडक्यांनीही मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच कोयते व दांडके हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत राजाराम सूर्यवंशी (वय ३१) हे ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मित्रांसोबत पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील रोझ आयकॉन सोसायटीसमोरील एचडीएफसी बँकेजवळ असलेल्या चहाच्या टपरीजवळ चहा पिण्यासाठी गेले होते.
त्यावेळी विजय रतन कोल्हे, संतोष ऊर्फ दादया नरवटे आणि अन्य सात अनोळखी व्यक्तींनी लोखंडी कोयते व लाकडी दांडके घेऊन बेकायदेशीर जमाव जमवला. त्यानंतर यशवंत सूर्यवंशी आणि त्यांचे मित्र विशाल आबा मोरे व आप्पाराव महादेव सूर्यवंशी यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्यांनी मारहाण केली.
यावेळी आरोपींनी ‘तू आमच्या विजय कोल्हे मामाच्या नादी लागतो का? थांब, तुला दाखवतो,’ असे म्हणत फिर्यादीच्या कपाळावर लोखंडी कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
आरोपींनी हातातील कोयते व लाकडी दांडके हवेत फिरवत ‘आम्ही इथले भाई आहोत. आमच्या कोल्हे मामाच्या नादी कोणी लागला, तर त्याला संपवून टाकू,’ असे मोठमोठ्याने ओरडून परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजून १६ मिनिटांनी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रतन कोल्हे, संतोष ऊर्फ दादया नरवटे आणि अन्य सात अनोळखी व्यक्तींविरोधात विविध कलमांनुसार कारवाई सुरू आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळगावे करीत आहेत.

















