न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक विचार करून पुढील योग्य कार्यवाही करू, असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले. प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांगांच्या आर्थिक सहाय्य, घरपट्टी सवलत, स्वयंरोजगार आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी दिव्यांगांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन व शिवांजली सखी मंच यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सव उत्साहात सुरू आहे. देवीच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक भेट देत असून, यानिमित्ताने नागरिक आपल्या समस्या व मागण्यांची निवेदने प्रत्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्याकडे सादर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या प्रतिनिधींनी शहरातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले.
दिव्यांग व्यक्तींना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच दैनंदिन जीवनात समान संधी मिळण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने केली आहे. प्रलंबित प्रश्नांबाबत महापालिका आयुक्तांना आवश्यक निर्देश देऊन तातडीने सकारात्मक कार्यवाही व्हावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्वतःच्या मालकीच्या घरात राहणाऱ्या पात्र दिव्यांग व्यक्तींना घरदुरुस्ती आणि आवश्यक सुधारणा करण्यासाठी एकरकमी दोन लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी प्रमुख मागणी आहे. घरपट्टीतील ५० टक्के सवलतीसाठी इंडेक्स-२ उपलब्ध नसलेल्या दिव्यांगांना पर्यायी मालकी कागदपत्रांच्या आधारे लाभ द्यावा. तसेच मालमत्ता नोंदीत ‘भोगवटादार’ म्हणून नोंद असलेल्या पात्र दिव्यांग व्यक्तींनाही ही सवलत मिळावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. सन २०१७ मध्ये साधन-साहित्य खरेदीसाठी दहा हजार रुपयांचे अनुदान मिळालेल्या पात्र दिव्यांग व्यक्तींनाही सध्याच्या नियमानुसार एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. पूर्वी मिळालेले साहित्य कालांतराने खराब किंवा वापरण्यायोग्य राहिले नसल्याने या लाभार्थ्यांच्या गरजांचा पुन्हा विचार करण्याची आवश्यकता संघटनेने मांडली आहे.
दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास दाम्पत्याला मिळणाऱ्या दोन लाख रुपयांच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ १ एप्रिल २०१३ पासून पूर्वलक्षी प्रभावाने द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. दिव्यांग-अव्यंग विवाहाच्या अर्थसहाय्य योजनेच्या धर्तीवर दोन्ही योजनांमध्ये समानता राखावी, अशी संघटनेची भूमिका आहे. स्वयंरोजगाराच्या प्रश्नावरही निवेदनात भर देण्यात आला आहे. सन २०१२ पूर्वी परवाना मिळालेल्या दिव्यांग स्टॉलधारकांना त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. यासंबंधी निवेदनात नमूद केलेल्या आदेशांची महापालिका स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
महापालिकेची उद्याने, बागा आणि मनोरंजन केंद्रांमध्ये दिव्यांगांना सहज प्रवेश व वापर करता यावा, यासाठी रॅम्प, सुगम मार्ग आणि अनुकूल स्वच्छतागृहे उपलब्ध करावीत. महापालिकेच्या सर्व इमारतींचे सुगम्यता परीक्षण अर्थात ‘ॲक्सेसिबिलिटी ऑडिट’ करून आवश्यकतेनुसार रॅम्प, लिफ्ट आणि इतर सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या सर्व मागण्या ऐकून घेत आमदार लांडगे यांनी सकारात्मक विचार करून पुढील योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे तसेच संघटनेचे प्रतिनिधी दत्ता भोसले, संगीता जोशी, सागर सुफल, रेवणनाथ कर्डिले आणि संजय मुंडे उपस्थित होते.
“नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधताना त्यांच्या अडचणीही समजून घेता येत आहेत. दिव्यांग बांधवांना सन्मानाने आणि स्वावलंबीपणे जगण्यासाठी समान संधी व आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजेत. प्रहार अपंग क्रांती संघटनेने मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून महापालिका प्रशासनाशी चर्चा करू. नियमांच्या चौकटीत योग्य कार्यवाही व्हावी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी पाठपुरावा करू.” – महेश लांडगे, आमदार, भाजपा भोसरी विधानसभा…


















