- वागण्यातला साधेपणा आणि प्रेमळ हास्य आजही मनाच्या कोपऱ्यात घर करून आहे..
- ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनावर आ. अमित गोरखे यांची शोकसंवेदना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ ऑक्टोबर २०२६) :- मराठी चित्रपटसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली असून, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःख ताजे असतानाच, आता मराठीतील लाडक्या आणि अष्टपैलू अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. एकापाठोपाठ एक जवळची जिव्हाळ्याची माणसं निरोप घेत असल्यामुळे मन सुन्न झाले आहे, अशा शब्दांत आमदार अमित गोरखे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
२०१३ मधील खास भेट..
ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या आठवणींना उजाळा देताना आमदार अमित गोरखे म्हणाले, २०१३ मधील तो दिवस आजही डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट उभा आहे, जेव्हा त्यांच्याशी कलारंग संस्थेच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भेट झाली होती. एका मोठ्या प्रतिभेची कलाकार असूनही त्यांच्या वागण्यातली साधी, मनमिळाऊ स्वभाव, माणुसकी, चेहऱ्यावरचे ते प्रेमळ हास्य आणि आपुलकीने चौकशी करण्याची त्यांची सवय आजही मनाच्या एका कोपऱ्यात घर करून आहे. त्या केवळ पडद्यावरच्या अभिनेत्री नव्हत्या; अनेक चित्रपटांमध्ये ‘लक्ष्या’च्या (लक्ष्मीकांत बेर्डे) आईच्या भूमिका असोत, किंवा ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी त्यांची इतर पात्रे असोत, त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. त्यांचा तो दिलखुलास स्वभाव आणि कलेशी असलेली एकनिष्ठता पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, असेही ते म्हणाले.
अजरामर भूमिका…
‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या अनेक सिनेमांमधील त्यांच्या अजरामर भूमिकांमधून त्या आपल्या सर्वांच्या मनात नेहमीच जिव्हाळ्याने जिवंत राहतील. मराठीतील लाडक्या आणि अष्टपैलू अभिनेत्री मधु कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.


















