- पात्रता, अनुभव आणि सेवा नियमांची पडताळणी होईल का?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कार्यरत सुरक्षा अधिकारी यांची उपायुक्तपदी नियुक्ती करण्याच्या संभाव्य हालचालींमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. या प्रस्तावित नियुक्तीपूर्वी संबंधित अधिकाऱ्याची पात्रता, प्रशासकीय अनुभव आणि प्रचलित सेवा नियमांची सखोल पडताळणी करण्याची मागणी होत आहे.
महानगरपालिकेतील उपायुक्तपद हे महत्त्वाचे प्रशासकीय पद असल्याने या पदावरील नियुक्ती करताना निर्धारित निकषांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. सुरक्षा अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची उपायुक्तपदी नियुक्ती कोणत्या सेवा नियमांच्या आणि प्रशासकीय निकषांच्या आधारे प्रस्तावित करण्यात आली आहे, याबाबत स्पष्टता असणे गरजेचे आहे.
प्रस्तावित नियुक्तीचा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, प्रशासकीय अनुभव आणि इतर अर्हतांची सक्षम स्तरावर तपासणी करण्याची मागणी होत आहे. तसेच, नियुक्तीचा प्रस्ताव सक्षम समितीसमोर मंजुरीसाठी मांडण्यापूर्वी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. या संभाव्य नियुक्तीबाबत महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नसून, प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असणारे जरांडे यांच्या संभाव्य ”उपायुक्त” या पदावरील नियुक्तीमागील प्रशासकीय कारणे आणि निकष आधी स्पष्ट करावेत, तसेच सर्व नियमांची पूर्तता झाल्याची खात्री होईपर्यंत अंतिम निर्णय घेऊ नये. प्रस्तावित नियुक्तीची प्रक्रिया प्रचलित सेवा नियमांशी विसंगत असल्याचे आढळल्यास नियुक्तीचा प्रस्ताव रद्द करावा.”
– सचिन काळभोर, भाजप कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते…


















