न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ ऑक्टोबर २०२६) :- औद्योगिक आणि वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात भाजलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र व सुसज्ज बर्न हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आग, गॅस सिलिंडर स्फोट आणि औद्योगिक अपघातांतील रुग्णांना तातडीने विशेष उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र बर्न हॉस्पिटल, बर्न आयसीयू, प्रशिक्षित डॉक्टर आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.
हॉस्पिटल सुरू होईपर्यंत विद्यमान महापालिका किंवा शासकीय रुग्णालयांत विशेष उपचार सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच आवश्यक निधी, जागा आणि मनुष्यबळासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करून कार्यवाहीचा तपशील लेखी द्यावा, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे.


















