- चालक, वॉर्डबॉय निलंबित; पालिकेची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ ऑक्टोबर २०२६) :- वायसीएम रुग्णालयातून ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत असताना धावत्या रुग्णवाहिकेतून वृद्ध रुग्ण खाली पडल्याच्या घटनेची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी रुग्णवाहिकेचा चालक अजितकुमार भगत आणि वॉर्डबॉय गजानन ठोंबरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
वृद्ध रुग्णाला पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, रुग्णवाहिकेचा दरवाजा व्यवस्थित बंद नसल्याने रुग्ण खाली पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेनंतर काही अंतर पुढे गेलेली रुग्णवाहिका पुन्हा घटनास्थळी आली. त्यानंतर रुग्णाला पुन्हा वाहनात घेऊन पुढील प्रवास सुरू करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या घटनेनंतर महापालिकेने संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, रुग्णवाहिका रवाना करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा तपासणी झाली होती का, दरवाजा आणि स्ट्रेचरच्या लॉकमध्ये तांत्रिक दोष होता का, याची चौकशी सुरू आहे. याबाबत अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी माहिती दिली.


















