- घोरवडेश्वराचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ ऑक्टोबर २०२६) :- देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भोसरीतील सख्ख्या भाऊ-बहिणीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॉटेल पुना गेटसमोर रविवारी (दि. ११) रात्री नऊच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. कौशिक रवी मुल्या (वय २१) आणि ऋषिता रवी मुल्या (वय १७) अशी मृत भावंडांची नावे आहेत.
दोघेही घोरवडेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. रात्री भोसरीकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी रात्री कौशिकचा, तर सोमवारी (दि. १२) ऋषिताचा मृत्यू झाला.
कौशिक आकुर्डीतील खासगी महाविद्यालयात द्वितीय वर्षात, तर ऋषिता अकरावीत शिकत होती. भोसरीतील प्रसिद्ध टेलर व्यावसायिक रवी मुल्या यांची ती मुले होती.
देहूरोड पोलिसांनी धडक देणारी दुचाकी जप्त केली असून, चालकाचा शोध सुरू आहे. तोही जखमी झाला असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिस रुग्णालयांमध्ये चौकशी करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलिस करत आहेत. या दुर्घटनेमुळे भोसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

















