न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२६) :- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील आंबेडकर चौकातील रिक्षा स्टँडवर झालेल्या वादातून दोन तरुणांनी रिक्षाचालकावर बर्फ फोडण्याच्या टोच्याने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या त्याच्या मित्राच्या छातीवरही टोच्याने वार करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल ऊर्फ आण्णा दिलीप धोत्रे (वय ३८. रा. निगडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आदनान शरीफ कुरेशी (वय अंदाजे २५) आणि मुस्तफा ऊर्फ मुसा शरीफ कुरेशी (वय अंदाजे २२, दोघेही रा. खडकी बाजार) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल धोत्रे आणि त्यांचे मित्र कैलास हनुमंत म्हेत्रे हे आंबेडकर चौकातील रिक्षा स्टँडवर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी दोन्ही आरोपी तेथे आले. आरोपींनी फिर्यादीला त्याच्या भावाला रिक्षात सीटवर बसताना त्रास का देतो, अशी विचारणा करत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत फिर्यादीला प्रथम चापट मारली.
त्यानंतर आरोपीने स्वतःजवळील बर्फ फोडण्याचा टोचा काढून फिर्यादीवर वार केला. फिर्यादीने तो वार चुकविल्याने टोचा त्यांच्या डाव्या कानाजवळून घासून गेला. दरम्यान, फिर्यादीचे मित्र कैलास म्हेत्रे हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले. त्यावेळी आरोपींनी त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने कैलास म्हेत्रे यांच्या छातीवर टोच्याने वार केला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून निघून गेले.
या घटनेप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टच्या कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.


















