- अॅड. राजेश राजपुरोहित यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ६ ऑक्टोबर २०२६) :- सुमारे १५ लाख १२ हजार रुपये किमतीच्या १४२.२३० ग्रॅम एमडी (MD) ड्रग्ज प्रकरणात पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला नियमित जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने अॅड. राजेश राजपुरोहित यांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणातील कथित अमली पदार्थांचे वजन १४२.२३० ग्रॅम असून त्यांची किंमत १५ लाख १२ हजार ३०० रुपये आहे.
आरोपीला २४ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील बिलारा येथे अटक करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणातील कथित अमली पदार्थांची जप्ती अन्य आरोपींकडून करण्यात आली होती, असा मुद्दा बचाव पक्षाने न्यायालयात मांडला.
जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने अॅड. राजेश राजपुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिर्णयांचा आधार घेत युक्तिवाद केला. अर्जदाराकडून थेट कोणत्याही अमली पदार्थाची जप्ती झालेली नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच, आरोपीचा या गुन्ह्याशी कथित संबंध जोडण्यासाठी सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे जामीन देण्याबाबत युक्तिवाद करण्यात आला.
दरम्यान, अभियोजन पक्षाने जामीन अर्जाला विरोध केला. आरोपीचा कथित अमली पदार्थ पुरवठा साखळीतील सहभाग, आर्थिक व्यवहार आणि पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख करत आरोपीला जामीन देऊ नये, अशी भूमिका अभियोजन पक्षाने मांडली.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला ५० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि त्याच रकमेच्या एक किंवा अधिक जामीनदारांच्या हमीवर नियमित जामीन मंजूर केला. यासोबतच न्यायालयाने आदेशात नमूद केलेल्या इतर अटींचे पालन करण्याचे निर्देशही दिले.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. राजेश राजपुरोहित, अॅड. प्रीती धुळे, अॅड. महेश मार्कड, अॅड. रोहित घोलप, तनया जगदाळे, प्रणिल चौधरी आणि विपुल पांडे यांनी बाजू मांडली.


















