न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १३ ऑक्टोबर २०२६) :- मोशी परिसरात एका अज्ञात महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) उघडकीस आली. मंत्रा मोमेंट हौसिंगच्या कमर्शियल ऑफिसमधील गाळा क्रमांक ७ समोर या महिलेचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून गंभीर दुखापत करत महिलेचा खून केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील मंत्रा मोमेंट हौसिंगच्या कमर्शियल ऑफिससमोर एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तेथे अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला.
मृत महिलेने भगव्या रंगाचा टी-शर्ट, त्यावर निळसर रंगाचे जीन्सचे जॅकेट आणि काळ्या व हिरव्या पट्ट्यांची ट्रॅकपॅन्ट परिधान केली होती. कोणत्यातरी कारणावरून अज्ञात व्यक्तीने हत्याराने मारहाण करून गंभीर दुखापत केली आणि तिचा खून केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेची ओळख पटविणे आणि खुनामागील कारण शोधणे, हे पोलिसांसमोर महत्त्वाचे आव्हान आहे.

















