न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका सराईत टोळक्याने आखलेला दरोड्याचा कट उधळला आहे. हिंजवडी पोलिसांनी शनिवारी (दि. २२) रोजी सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारी घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.
शुभम मणीलाल जैन (वय २१), प्रशांत किशोर मोरे (वय २७), विशाल अरुण वाघ (वय २२), प्रतीक शिवाजी बारी (वय २०), प्रशांत पाटील, रामेश्वर राठोड (सर्व रा. जामनेर, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलिस नाईक अतिक शेख यांना माहिती मिळाली की, हिंजवडी मारुंजी रोडवर कारमध्ये काही इसम संशयितरित्या थांबले आहेत. त्यानुसार तपास पथकातील कर्मचारी मारुंजी रोड येथे गेले असता त्यांना पाहून आरोपींनी पळ काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून नेरे रस्त्यावर त्यांची कार अडवली. कारची झडती घेतली असता पोलिसांना कारमध्ये लोखंडी कट्यार, गुप्ती, चाकू, पिस्तूल सारखे दिसणारे लायटर मिळून आले.
पाठलाग करून पकडलेल्या आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता, सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसी खाक्यासमोर ते जास्त काळ टिकू शकले नाही. काही वेळातच त्यांनी मारुंजीतील एच. पी. पेट्रोल पंप लुटण्याचा प्लॅन केल्याची कबुली दिली. त्यासाठी ते कारमध्ये दबा धरून बसले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
हिंजवडी पोलसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क करून माहिती घेतली असता, यानुसार आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये शस्त्राचा धाक दाखवून ६ लाख लुटल्याची माहिती समोर आली. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली.















