न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने लोकशाहीदिनाचे आयोजन केले आहे. त्याबाबत माहितीसाठी महापालिकेच्या मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, नागरी सुविधा केंद्राकडून प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे जुलै २०१९ मधील पहिल्या सोमवारी (दि. ०१ जुलै) रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या मुख्य अतिरिक्त आयुक्त-१ यांचे दालनात लोकशाही दिनाचे आयोजन केलेले आहे.
लोकशाही दिनामध्ये निवेदने सादर करणाऱ्या नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते कि, नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. मनपा मुख्य भवनातील लोकशाही दिनास उपस्थित राहणेकरीता नागरीकांनी प्रथम नागरी सुविधा केंद्र विभागाकडे आवश्यक कागद पत्रांसह लोकशाही दिनापूर्वी १५ दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.
मनपाच्या विविध विभागांकडे लोकशाही दिनाचे १५ दिवसापूर्वी अर्जदाराकडून प्राप्त झालेले अर्ज दोन प्रतीत असणे आवश्यक आहे. अर्ज विहित प्रक्रियेनुसार योग्य अर्जा संदर्भांत संबंधित खात्यांनी स्वीकारलेल्या अर्जाबाबत लोकशाही दिनामध्ये नागरी सुविधा केंद्र विभागाकडून टोकन प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. पुढील प्रक्रियेकरिता पाठविलेल्या अर्जाबाबत लोकशाही दिनात सुनावणी होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. विहित नमुन्यातील निवेदने / अर्ज नसल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत :-
१) न्यायप्रविष्ठ बाबी.
२) राजस्व / अपील.
३) सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी.
४) विहित नमुन्यातील अर्ज नसल्यास व त्या सोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
५) अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषय संदर्भात केलेले अर्ज.
वरील प्रमाणे अर्ज लोकशाही दिनांकरीता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत व अशा अर्जावर लोकशाही दिनात सुनावणी घेतली जाणार नाही, परंतु असे अर्ज नियमानुसार पुढील ८ दिवसात संबंधित खात्याकडे पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात येतील. तरी कृपया संबंधित नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे या पत्रकात म्हटले आहे.
.















