न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ जून रोजी महापालिकेच्या शहर अभियंतापदी प्रतिनियुक्तीवर अ. मा. भालकर यांची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सह सचिव सं. द. सूर्यवंशी यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
त्यामुळे महापालिकेतील भाजपच्याच सत्ताधा-यांनी महापालिकेतील अधिका-याला शहर अभियंतापदी बढती दिली आहे. प्रतिनियुक्तीवरील अभियंत्यावरुन महापालिकेतील सत्ताधा-यांनी स्वपक्षाच्याच राज्यातील सरकारशी संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिका सत्ताधारी भाजप व राज्य भाजपमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवार (दि. २०) रोजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करणेत आली होती. या सभेत सत्ताधारी भाजपने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर अभियंता पदावर राजन पाटील यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत उपसूचनेव्दारे मंजूर केला होता.
सत्ताधा-यांनी चक्क स्वच्छ भारत अभियानातील शौचालय बांधण्याच्या अवलोकन प्रस्तावास शहर अभियंता बढतीची विसंगत उपसूचना देउन विषय रेटून नेला. यावरून विरोधी पक्षाने सभागृह डोक्यावर घेत या विषयाला विरोध केला होता. याचा उलगडा झाला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरू लागली आहे.















