न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त येणा-या सर्व वारकऱ्यांसाठी आकुर्डी येथे निवास, पाणी, विद्युत व शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील खड्डे दुरुस्ती करण्यात येत असून सर्व वारक-यांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती महापौर राहूल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त व्यवस्थेच्या अनुषंगाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी महापौर राहूल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळयाचे पिंपरी चिंचवड शहरात दि. २५/०६/२०१९ रोजी आगमन होणार आहे. त्यांची मुक्कामाची व्यवस्था आकुर्डी येथे करण्यात आली आहे.
वारक-यांसाठी मुक्कामाची व्यवस्था महापालिका शाळा इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. त्याठिकाणी पुरेशी पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची, पाण्याच्या टँकरची व प्रकाश योजनेची व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे. पालखी मार्गावर पुरेशी प्रकाश योजना, आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात दर्शन बारी साठीची व्यवस्था, पालखी मार्गावरचे अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेले असून कचराकुंड्या स्वच्छ ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.















