- प्रभाग क्रमांक १९ विसडम पार्क व शांग्रीला हाऊसिंग सोसायटीतील समस्या लावल्या मार्गी
- विकासकामांमुळे नागरिकांमध्येही समाधानाची भावना
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील प्रभाग क्रमांक १९ मधील विसडम पार्क व शांग्रीला हाऊसिंग सोसायटी परिसरात विविध विकासकामे जोर धरू लागली आहेत. नुकताच या परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ नगरसेवक शैलेश मोरे यांच्या प्रयत्नातून झाला.
हा परिसर साधन असूनही प्रशासनाचे या परिसराकडे दुर्लक्ष होत होते. गेल्या चार वर्षांपासून या परिसरात समस्या आ-वासून उभ्या होत्या. या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांनीही या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत आवाज उठविला होता. मात्र, प्रशासनाकडून कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला होता.

कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी नगरसेवक शैलेश मोरे यांनी विसडम पार्क व शांग्रीला हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांना बरोबर घेऊन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे दालन गाठले व त्यांना पुढील पंधरा दिवसात सोसायटीतील गेल्या ४ वर्षांपासून रेंगाळलेल्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास पुढील घटनांना तुम्ही स्वतः जबाबदार असाल, असा निर्वाणीचा इशाराही मोरे यांनी दिला होता.
आयुक्त हर्डीकर यांनीही या मागण्यांची दखल घेतली. तसेच तात्काळ या सोसायटी परिसरातील समस्या सोडविण्याच्या व परिसरात विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. प्रशासनाने देखील तत्परतेने कार्यवाही करत, सोसायटी परिसरातील समस्या मुदतीआधी मार्गी लावल्या. त्यामुळे रस्त्याची कामे, पथदिवे बसविणे व आदी कामे या परिसरातील पूर्ण झाली असून, काही कामे प्रगतीपथावर आहेत. परिसरातील नागरिकांनी सोसायटी परिसरात कामे चालू झाल्यामुळे समाधान व्यक्त केले. तसेच नगरसेवक शैलेश मोरे यांचे आभारही मानले.











