न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- विठुरायाच्या ”विठ्ठल विठ्ठल !जय हरी विठ्ठल!!” या नामघोषात आणि टाळ मृदंगांच्या गजरात संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पालखीने अखेर पिंपरी चिंचवडची वेस ओलांडून पंढरीकडे प्रस्थान ठेवले. काल देहूतून सायंकाळी तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात आली.
यावेळी तिचा पारंपारिक मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात होता. उद्योगनगरीतील लाखो भाविकांनी तुकारामांच्या चरणी माथा टेकविला व आशीर्वाद घेतले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनेदेखील सहभागी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वारकऱ्यांना अन्नदान, फराळवाटप व विविध साहित्यांचे वाटप केले.
आज भल्या पहाटे पालखीने आपल्या पंढरपूर मुक्कामाकडे कूच केली. शहरातील मार्गावरून पालखी पांथस्थ होताना विविध ठिकाणी चौक्या लावून भाविकांनी वारकऱ्यांना अल्पोहार, चहा-बिस्कीट, पाणीवाटप व पुढील प्रवासास उपयोगी पडेल अशा साहित्यांचे वाटप केले. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पुढील मुक्काम पुणे शहरात असून त्यासाठी पुणे शहर पालखीचे स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने मंगळवारी सायंकाळी उशिरा देऊळ वाड्यातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. या वेळी अवघी अलंकापुरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली होती.

बुधवारी पहाटे माउलींची पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. माउलींच्या समाधी मंदिरात पहाटे चार वाजता घंटानादाने या वैभवी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर काकडा आरती झाली. पहाटे सव्वाचार ते साडेपाच या वेळात माउलींना अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी नऊला माउलींच्या समाधीच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास माउलींना महानैवेद्य दाखविण्यासाठी दर्शनबारी बंद करण्यात आली. त्यानंतर गाभारा स्वच्छ करून समाधीस पाणी घालण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या मानाच्या हिरा व मोती आश्वांचा देऊळवाड्यात प्रवेश झाला.
प्रस्थानापूर्वी समाधी मंदिरात गुरू हैबतबाबांच्या व सस्थांनच्या वतीने माउलींची आरती घेण्यात आली. मानापानाच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माउलींच्या पालखीने वीणा मंडपातून प्रस्थान ठेवले. या वेळी अवघा देऊळवाडा माउली-माउलीच्या जयघोषाने दुमदुमून गेला. मंदिर प्रदक्षिणा घालून पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली, नगरप्रदक्षिणा घालून, माउलींच्या आजोळघरी गांधी वाड्यात विसावली. त्यानंतर आज पहाटे आळंदिवरून दिघीत पालखी आली असता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुख व वारकऱ्यांचा भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखीने पुण्याच्या दिशेने प्रस्तान केले.















