न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात १ हजार ३०० कोटी रुपये खर्चाची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यातील अनेक निविदा अंतिम टप्प्यात असून, कामांनुसार खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य व केंद्राकडून आतापर्यंत २९१ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. नगरविकास विभागाचे केंद्रीयमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी देशभरातील स्मार्ट सिटीच्या अधिका-यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी (दि. २५) संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, शहर अभियंता राजन पाटील आदी उपस्थित होते.
आयुक्त हर्डीकर म्हणाले की, ‘पॅन सिटी’ अंतर्गत शहरात ७५० किलोमीटर अंतराच्या फायबर केबल नेटवर्किगचे काम सुरू असून आतापर्यंत शहरात ५.५ किमी अंतराचे काम पूर्ण झाले आहे. एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत सौदागर व पिंपळे गुरव या २३ किलोमीटर भागांत स्मार्ट रोड विकसित करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचा खर्च २६५ कोटी ३ लाख आहे.
सौर ऊर्जेतून वीजनिर्मिती प्रकल्प ‘रेस्को’ तत्वातून सेक्टर क्रमांक २३ साठी वायसीएम रुग्णालय इमारतीवर सुरू करण्यात आला आहे. जीआयएस मोबाई तंत्रज्ञानाद्वारे शहराचे सव्रेक्षण जाणार आहे. पिंपळे गुरवमध्ये पीपीपी तत्त्वावर व्हिलेज प्लाझा विकसित केला जाणार आहे, अशा विविध कामांची माहिती आयूक्तांनी यावेळी दिली.















