न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या वर्तवणूकीमुळे महापालिकेची प्रशासकीय आचारसंहिता मोडीत निघत, महापालिकेच्या आजवरच्या प्रशासकीय कारभाराला बट्टा लागलेला आहे. नुकतेच त्यांनी प्रशासकीय आचारसंहिता मोडीत शहर भाजपच्या कार्यालयात जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे आयुक्त हे सत्तारुढ भारतीय जनता पक्षाचे घरगडी, दलाल, प्रवक्ते म्हणून काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भ्रष्ट आयुक्त आहेत. त्यांच्या या प्रकरणाने सर्वच माध्यमातून आयुक्त हर्डीकर यांच्यावर टीका होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आयुक्त हर्डीकर यांच्या या गंभीर प्रकरणाची व त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची चौकशी करुन, त्यांचे निलंबन करावे, असे पत्र पाठविले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सन २०१७ पासून आयुक्त श्रावण हर्डीकर कार्यरत आहेत. सन २०१७ पासून महापालिकेत पूर्ण बहूमताची सत्ता भाजपाकडे आहे. गेली ३ वर्षे महानगरपालिकेच्या कारभारात अनेक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाले आहेत. यामध्ये ३१ मार्च २०१७ च्या अगोदरचे ठेकेदारांचे बिलं स्थायी समितीने अडवून कोट्यवधीचा घोटाळा केला. पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेतील घोटाळा, र.रु. ५ हजार कोटी टि.डी. आर वाटप व त्यातील घोटाळा, कचरा निविदेतील घोटाळा, रस्ते विकास निविदेतील घोटाळा, चिंचवड विधानसभा भागातील बांधकाम परवाना, पाणी, एन.ओ.सी. बंद करणे व सुरु करण्यामधील घोटाळा, बांधकाम परवाना विभागातील विविध प्रकल्पातील घोटाळे, संतपीठ उभारणे निविदेतील घोटाळा आदी प्रकरणात महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार, सल्लागारांनी संगनमत करुन घोटाळे केले. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र तेही यात सहभागी होऊन त्यांनी या सर्व घोटाळ्यांना पाठीशी घातले. नव्हे नव्हे अत्यंत निरलज्जपणे भाजपचे घरगडी, दलाल, प्रवक्ते असल्याप्रमाणे जाहीररित्या समर्थण केले, असेही भापकर म्हणाले.
भाजपचे घरगडी, दलाल, प्रवक्ते अशी शेलकी विशेषणे नावापुढे चिकटली असतानाच निर्ढावलेल्या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी दि. २५ जून २०१९ रोजी थेट मोरवाडी येथील भाजप पक्ष कार्यालयात हजेरी लावली. पक्षीय कार्यक्रमात आगंतुक आलेल्या महापालिका आयुक्तांनी सर्व शासकीय शिष्टाचार, संकेत बाजूला सारत बंद दाराआड पालकमंत्र्यांशी ‘गुफ्तगू’ करत चहापानही केले. पुण्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकात पाटील यांचा पिंपरी चिंचवड भाजपतर्फे मंगळवार दि. २५ जून २०१९ सत्कार करण्यात आला. त्या निमित्त भाजपच्या मोरवाडीतील कार्यालयात पालकमंत्र्यांनी पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी भाजपा नगरसेवक पदाधिकारी, आमदार व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन सुरु असताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांचे आगमन झाले. त्यामुळे नगरसेवकांसह सर्वजणांच्या भुवया उंचावल्या. मंत्रीमहोदयांचे भाषण संपेपर्यंत आयुक्त भाजप कार्यालयात थांबून होते.
भाजपचे नवीन पक्ष कार्यालय महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. पालकमंत्र्यांनी महापालिकेत येऊन आढावा घेणे अपेक्षित असताना आयुक्त हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांची ‘सरबराई’ करण्यात धन्यता मानली. बंद दाराआड ‘गुफ्तगू’ केले. ’कमळ’ चिन्ह असलेल्या कपबशीतून चहापानाचा आनंद घेतला. महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एकही आयुक्त एकदाही सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात गेलेला नाही. मात्र, श्रावण हर्डीकर त्याला अपवाद ठरले आहेत, असेही भापकर म्हणाले.
भारतीय प्रशासन सेवेमध्ये असणा-या सनदी अधिका-यांना अनेक बंधने असतात. कुठल्याही सनदी अधिका-यांना पक्षीय अथवा राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही. त्याकडे दुर्लक्ष करुन पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व संकेत राजशिष्टाचार पायदळी तुडवले. सनदी अधिकारी पेशाला कलंक ठरावा अशी कृती त्यांनी केली आहे. त्यांना भाजप प्रेमाचा इतका पुळका आला असेल तर सनदी सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी सरळ भाजपा प्रवेश करुन पक्षीय राजकारणाला सुरुवात करावी. त्यास आमची कुठलीही हरकत असणार नाही. मात्र महापालिका आयुक्तांच्या खुर्चीवर बसून भाजपाची वकीली, दलाली त्यांनी करणे हे सरळ सरळ भारतीय प्रशासन सेवेमधील नियमांचे व सर्व संकेत, राजशिष्टाचाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे सत्तारुढ भाजपाचे घरगडी, दलाल, प्रवक्ते म्हणून काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भ्रष्ट आयुक्त श्रावण हर्डीकर यांची हे प्रकरण व त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची चौकशी करुन निलंबन करावे, असे या पत्रात भापकर यांनी म्हटले आहे.
या पत्राची प्रत त्यांनी डॉ. जितेंद्र दिक्षीत, केंद्रीय राज्यमंत्री अस्थापना विभाग, मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.सचिव, केंद्रीय अस्थापना विभाग नवी दिल्ली. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मा. प्रधान सचिव, नगरविकास महाराष्ट्र राज्य यांना पाठविली आहे.















