न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून) :- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये विनाकारण घुटमळणाच्या पोलिस कर्मचा-यांना आयुक्तांनी चाप लावला आहे. आयुक्तालयामध्ये येण्यापूर्वी कर्मचा-यांना पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिका-याची परवानगी घ्यावी लागणार आहे.
याबाबत पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी गुरुवारी (दि. २७) रोजी आदेश जारी केला. पोलिस आयुक्तालयाच्या इमारती भोवती पोलिस कर्मचारी घुटमळत असल्याचे आयुक्त पद्मनाभन यांच्या निदर्शनास आले. आयुक्तालयाच्या विविध शाखांमध्ये काही कर्मचारी व अधिकारी जात असल्याने तेथील कामामध्ये व्यत्यय येत होता. तेथील कर्मचा-यांच्या वेळेचा अपव्यय होत असल्यामुळे महत्त्वाची कामे रेंगाळली जात होती.
आयुक्तालयामध्ये येण्यापूर्वी कर्मचा-यांना पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अधिक-यांना कामकाज चालणा-या विभागांमध्ये जाण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त (पास) व पोलिस उपायुक्त मुख्यालय यांची परवानगी लागणार आहे. यांच्या परवानगीशिवाय कर्मचारी किंवा अधिकारी दिसून आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.











