न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- शहरातील दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत मेट्रो मार्गाचे काम आणखी गतिमान करा. पावसाळ्यात काम करताना सुरक्षेकडे विशेष लक्ष द्या, यासह विविध सूचना महामेट्रोचे कार्यकारी व्यवस्थापक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.
डॉ. दीक्षित यांनी या संपूर्ण मार्गाची गुरूवारी (दि. २७) रोजी पाहणी केली. या वेळी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार, कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, रिच वनचे कार्यकारी संचालक गौतम बि-हाडे आणि अधिकारी उपस्थित होते.
चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुल येथील मार्गिकवर मेट्रो डब्याची देखरेख करण्यासाठी ‘इन्स्पेक्शन पीट’ तयार करण्यात येणार आहे. त्या कामासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. तसेच, पिंपरी चिंचवड महापालिका भवन, संत तुकारामनगर, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी या मेट्रो स्टेशनची त्यांनी पाहणी केली. या स्टेशनचे पिलर आर्म्स तयार झालेले असून, संत तुकारामनगर स्टेशनचे प्लॅटफॉर्म पिलर यात आर्म्स तयार केले जात आहेत. तसेच, दोन्ही बाजूने जिन्याचे कामही सुरू झाले आहे. पावसाळ्याच्या दृष्टीने संपूर्ण मार्गावरील काम करताना सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जावे, असे त्यांनी स्पष्ट केले.











