न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- देहूरोडस्थित खासगी रुग्णालयाने कच-याच्या गाडीमध्ये सोळा आठवड्यांचे मृत अर्भक फेकले. हा धक्कादायक प्रकार देहरोड येथे उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित रुग्णालयाच्या विरोधात देहूरोड पोलिसांनी गुरुवारी (दि. २५) रोजी गुन्हा दाखल केला. याबाबत डॉ. यामिनी अद्वैत अडवे (५५, रा. देहूरोड) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जीवन रेखा रुग्णालयाच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यामिनी यांना जीवनरेखा रुग्णालयाने कच-याच्या गाडीत अर्भक फेकल्याची माहिती मिळाली. त्यांनी पाहणी केली असता कच-याच्या गाडीतील एका कप्प्यामध्ये त्यांना मृत अर्भक मिळून आले. त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता बुधवारी एका महिलेने मृत अर्भकाला जन्म दिल्याची माहिती समोर आली.
डॉ. जीमेश मवाणी यांनी ते मृत अर्भक जैव वैद्यकीय भांडार गृहात ठेवले होते. गुरुवारी रुग्णालयातील कर्मचा-यांनी अर्भक कच-याच्या गाडीत फेकले. यावेळी कच-याच्या गाडीवरील एका कर्मचा-याने यामिनी यांना याबाबत माहिती दिली. या कृतीबद्दल रुग्णालयाच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















