न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- दापोडी येथील फलकावर पिंपरी चिंचवड महापालिकेने एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करीत, शिवसेनेकडून या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. शिवसैनिकांच्या वतीने महापालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांना निवेदन देत निषेध नोंदविला.
शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक रोमी संधु, उपशहर प्रमुख तुषार नवले, अमोल निकम, विभाग प्रमुख राजेश वाबळे, राजू सोलापुरे, अर्जुन जम, विनोद जाधव, सुनील ओव्हाळ, विजय जाधव आदी उपस्थित होते.
दापोडीमध्ये शिवसेनेसह इतर राजकीय पक्षांचे फलक लावले होते. परंतु, महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने सरसकट सर्व फलकांवर कारवाई करण्याऐवजी हेतूपुरस्पर केवळ शिवसेनेच्या फलकावर कारवाई केली. फलक हटविण्याऐवजी तो चुकीच्या पद्धतीने फाडण्यात आला. संबंधित अधिका-यांवर महापालिकेने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.















