न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २९) रोजी आगीच्या दोन घटना घडल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या आगीने मोठे रौद्ररूप धारण केल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पहिली घटना भोसरी येथे घडली. गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने भोसरी एमआयडीसी येथील अनंत एंटरप्राईजेसच्या एमएनजीएल डिस्ट्रीक रेग्युलेटिंग स्टेशनमध्ये आग लागली. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आग वेळेवर अटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
भोसरी एमआयडीसी येथील एमएनजीएल डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशनमध्ये इनलेट गॅस सप्लाय स्टेशन आहे. त्या स्टेशनमध्ये सकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी गॅस गळती झाल्यामुळे आग लागली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशामक केंद्राचे दोन बंब, भोसरी उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. काही वेळ कुलिंगचे काम केल्यानंतर एमएनजीएल कंपनीला घटनेची माहिती देण्यात आली. कंपनीकडून इनलेट गॅस बंद करण्यात आला. त्यामुळे आग आटोक्यात आली. वेळीच मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुसरी घटना कुदळवाडी परिसरात घडली आहे. भर पावसात पुठ्ठयाच्या गोडाऊनला आज दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. धुराचे लोटच्या लोट बाहेर येत असल्याने परिसरातील नागरिक भांबावले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
कुदळवाडीतील जुन्या पोलिस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पुठ्ठ्याच्या गोडाऊनला अचानक आग लागली. धुराचे लोटच्या लोट बाहेर येत असल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. ही आग अटोक्यात आणण्यासाठी पिंपरीतील तीन, चिखलीतील पाच, तळवडेतील पाच, भोसरीतील चार आणि प्राधिकरणातील एक असे १४ बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने, ही आग विझवण्यासाठी यश आले.
ही कामगिरी उप अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, शांताराम काटे, लिडिंग फायरमन संजय ठाकूर, फायरमन कैलास वाघिरे, सरोष फुंडे, अमोल चिपळूणकर, कृष्णा कदम, कैलास डोंगरे, पुंडलिक भुतापले, संभाजी दराडे, नितीन गोगोले, वाहन चालक विशाल बाणेकर, देवा जाधव यांच्या पथकाने केली.















